
पुणे : सध्या महाराष्ट्रभरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. याची झळ जनावरांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका आणि ओला चारा, तसेच कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
सुका आणि ओला चारा वाहतुकीवर बंदी….
यंदा खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पाण्याअभावी अनेक ठिकाणी उभी पिके जळून गेली. याचा परिणाम चारा उत्पादनावरही झाला असून, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा बाहेर विक्रीसाठी पाठवला गेल्यास स्थानिक पातळीवर टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुधनाला पुरेसा चारा मिळावा आणि संभाव्य समस्या टाळता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.
