मुंबई: बॉलिवूडमध्ये दररोज कलाकारांच्या रिलेशनशिप आणि अफेअरच्या बातम्या येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने इंटरनेटवर आग लावली आहे. काही महिन्यांपूर्वी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी धुमाकूळ घातला होता. तब्बल दोन वर्षे हे कपल वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत होते. मात्र, अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, ब्रेकअपला वर्ष होत नाही, तोच विजय वर्मा आणि त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडच्या व्हिडीओने तापमान वाढवले आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा दमदार अभिनेता विजय वर्मा सध्या त्याच्या चित्रपटांपैक्षाही खाजगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयचे नाव ‘जवान’ फेम गायिका आणि अभिनेत्री आलिया कुरेशी हिच्यासोबत सातत्याने जोडले जात आहे. अद्याप या दोघांनीही आपल्या नात्यावर मौन बाळगले असले, तरीही नुकतंच मुंबईत पार पडलेल्या एका पार्टीतील व्हिडीओमुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
