
ठाणे: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात पोलीस तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख अमरसिंह जाधव यांनी या प्रकरणी मोठी माहिती दिली आहे. सध्या अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची देखील चौकशी केली जात असल्याची माहिती SIT प्रमुख अमरसिंह जाधव यांनी दिली आहे.
या हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती जे काही पुरावे आणि धागेदोरे लागत आहेत, त्या आधारे सखोल पडताळणी केली जात आहे. जे कोणी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोपींच्या संपर्कात होते किंवा ज्यांनी आरोपींना कोणत्याही प्रकारची मदत अथवा सहकार्य केले आहे, अशा सर्व संबंधितांची कसून चौकशी केली जाणार आहे. तपासादरम्यान ज्यांची नावे समोर येतील किंवा ज्यांचा सहभाग संशयास्पद वाटेल, त्या प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले जात असून, या गुन्ह्यामागे असणारे बळ आणि जाळे उघडकीस आणण्यासाठी एसआयटी सर्व बाजूने तपास करत असल्याचे अमरसिंह जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
